भोपाळ ( वृत्तसंस्था ) – भोपाळमध्ये बाजारिया पोलीस स्टेशन परिसरातील माथेफिरू तरुणाने भरधाव वेगाने कार दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसवली या घटनेत एकाचा मृत्यू झाला सहा जण जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मिरवणुकीत लहान मुले, वयोवृद्ध आणि महिलाही सहभागी होत्या. लोकांनी कार चालकाला पकडण्यासाठी पाठलाग केला. मात्र, तो पळून गेला. लोक संतापल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या या कारवाईनंतर वातावरण अधिकच तापले.
शनिवारी रात्री भाविक दुर्गा विसर्जनासाठी स्टेशन परिसर बाजारिया येथे जात होते. इतक्यात भरधाव कार मिरवणुकीत घुसली. धावपळीनंतर कार मागे घेऊन चालकाने पळ काढला. यानंतर भाविकांनी पोलीस स्टेशन बाजारियासमोर चक्काजाम आंदोलन केले.
भोपाळचे डीआयजी इर्शाद वली यांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी विसर्जन मिरवणूक स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या समोरून जात होती, यावेळी चांदबार बाजूने वेगाने येणारी कार लोकांना धडक देत मिरवणुकीत घुसली. जोपर्यंत लोकांना काही समजत नाही तोपर्यंत कार चालकाने वेगाने कार मागे घेत तेथून पळ काढला.