जळगाव ( प्रतिनिधी ) – अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक आज एका अधिपरिचारिकेचा बळी घेतला आहे .
या अपघातात दगावलेल्या अधिपरिचारिका प्रेरणा देविदास तायडे ( वय ३२ ) ह्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेमणुकीला होत्या . सकाळी ८ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंतची आपली नवजात शिशु दक्षता कक्षातील ड्युटी संपवून त्या घराकडे परत जात होत्या . प्रेरणा तायडे मूळच्या भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील रहिवाशी होत्या त्यांचे पती अमोल सपकाळे वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला आहेत .
या दुर्घटनेत डंपरच्या पुढील चाकात सापडलेल्या दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले एम एच १९ – वाय -७७७३ असा प्रेरणा तायडे यांच्या दुचाकीला चिरडणाऱ्या डम्परचा क्रमांक आहे . घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कालच जळगाव शहरात शिव कॉलनीनजीक भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने रिक्षाचा पार चेंदामेंदा करुन टाकला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर आज ही दुर्दैवी घटना घडली .