पारोळा शहरात धरणगाव चौकात घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- शहरातील बायपास धरणगाव चौक येथे सोमवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता घडलेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत दुचाकीस्वाराचे नाव कालू उर्फ घनश्याम ममराज राठोड (वय ३५, रा. वारेली, जि. कोडदारा, गुजरात) असे आहे. कालू राठोड आपला मित्र विष्णू संतोष जाधव याला सोबत घेऊन (एमएच १९ सीएच ९०४५) या दुचाकीने पारोळ्याकडून जळगावकडे येत होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, त्यांच्या मागून येणाऱ्या (एमएच ५४ ०३५८) या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कालू उर्फ घनश्याम राठोड याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेला मित्र विष्णू संतोष जाधव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या कुटीर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालक विक्रमसिंग अवधराज सिंग (रा. मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पाटील करत आहेत.