चाळीसगाव शहरातील दुपारची घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गणेश रोडवरील गणेश कॉम्प्लेक्समध्ये तळोंदा प्र. चा. येथील मोटार रिवाईंडिंग करणाऱ्या दुकानदाराची १ लाख ९० हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविली. ही घटना सोमवारी दि. २५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा प्र. चा. येथील मोटार रिवाईंडिंगचे काम करणारे अशोक लक्ष्मण राठोड यांनी चाळीसगाव येथील चोलामंडल बॅंकेतून १ लाख ९० हजारांचे गृहकर्ज घेतले. कर्जाची रक्कम राठोड यांच्या ॲक्सिस बॅंकेच्या खात्यात वर्ग केली होती. ही रक्कम त्यांनी सोमवारी दुपारी काढून पिशवीत ठेवली. यानंतर ते कामानिमित्त दुचाकीने कॉम्प्लेक्समध्ये आले. काम आटोपल्यानंतर त्यांनी पैशांची पिशवी दुचाकीच्या अडकवली आणि त्याचदरम्यान चोरट्याने ती लंपास केली.
पिशवी दुचाकीला नसल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक राठोड यांनी शोधाशोध केली. मात्र पिशवी सापडून न आल्याने या घडल्या प्रकाराची माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिली. यानंतर पोलिसांचे पथकाने कॉम्प्लेक्समधील काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर ज्या बँकेतून अशोक राठोड यांनी पैसे काढले होते, त्या बँकेतील सीसीटीव्हीही तपासले. मात्र, उशिरापर्यंत चोरट्याचा शोध लागला नाही. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.