शहरात पोलिसांसह कामगार कार्यालय, बालविकास विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : – शहरात बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले जात असल्याचे उघड झाले असून दि. १९ जून रोजी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरातून ६ बालकामगारांची सुटका करण्यात आली. सहायक कामगार आयुक्त कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली.
सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नाणूमल मेघवाणी (वय ५३, रा. गणपती नगर) आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शिनकर (वय ५१, रा. आदर्श नगर) या दोन दुकान मालकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत बालकामगारांकडून कमी वेतनात काम करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला मिळाली होती.(केसीएन)या माहितीच्या आधारे, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली. या तपासणी दरम्यान, फुले मार्केट परिसरातील ‘सागर सुटकेस सेंटर’ या दुकानात ४ बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले.
तसेच, याच परिसरातील ‘ओम ट्रेडिंग’ या किराणा दुकानातही २ बालकामगार आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही दुकानांतून एकूण ६ बालकामगारांची सुटका केली. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने या संदर्भात जितेंद्र सुभाष पवार (वय ३८, रा. खोटे नगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार, सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नाणूमल मेघवाणी (वय ५३, रा. गणपती नगर) आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शिनकर (वय ५१, रा. आदर्श नगर) या दोघांविरोधात बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.