चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) – एका कृषी केंद्राच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने ३५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. शहर पोलिसांनी गतिमान तपास करीत सीसीटीव्हीच्या साहाय्याने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील “फकीरराव रामराव कंपनी खते व बियाण्या’च्या दुकानात १९ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास कोणी नसल्याचा गैरफायदा घेवुन अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ड्रावर मधुन ३५ हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर फिर्यादी सतीष बाबुराव भालारे रा. चाळीसगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एका पथकाची नियुक्ती केली. यामध्ये पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, नंदकिशोर महाजन, प्रविण जाधव, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, विनोद खैरनार अशांना आरोपी शोधाबाबत सूचना देण्यात आल्या.
पथकाने घटनास्थळी जाऊन दुकानातील सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. एक संशयीत इसम हा चोरी करतांना दिसुन आला. इसमाबाबत गोपनीय माहीती काढण्यात आली असता तो ७ वी गल्ली, क्रांतीवीर चौक पारोळा रोड, धुळे येथे राहत असल्याबाबत माहीती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आनंदा राजु सरोदे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेतले.
सदर आरोपीतास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन याव्यतिरिक्त चाळीसगाव शहरातील एका भांडे विक्री करणाऱ्या दुकानातुन एक मोबाईल फोन चोरी केल्याची अजून कबुली दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ योगेश बेलदार, पोकॉ निलेश पाटील हे करीत आहेत.