जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटनेचा पोलिसांकडून यशस्वी तपास
पहूर ता. जामनेर (वार्ताहर) :- येथील एका किराणा दुकानातून ९६ हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादीच चोर निघाल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनने संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून ७० हजार रुपये जप्त केले आहे.
येथील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या मुंदखेड येथील कैलास शंकर सटाले या फिर्यादीने पहुर पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर रोजी पैसे चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तोच या गुन्ह्यात चोर निघाला. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी फिर्यादी कैलास सटाले हा पैसे घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने सायकलला अडकवलेली पैशाची बॅग चोरून नेल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते.
दरम्यान, फिर्यादी सटाले हा पहूर येथील किराणा दुकानाचे संचालक हर्षद जैन यांच्याकडे मागील ५ वर्षापासून काम करत होता. दरम्यान, तपासादरम्यान यातील फिर्यादीनेच चोरीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. कैलास सटाले यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने स्वतःच्या आजाराच्या उपचारासाठी ही रक्कम चोरून नेल्याचे कबूल केले. चोरीस गेलेल्या ९६ हजार रुपयांपैकी ७० हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप व सहकारी करत आहेत.