चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरात शनिवारी भर दिवसा पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी दुचाकीला लावलेली पिशवी हातचलाखीने लांबवली. सदरील पिशवीत तीन लाखांची रोकड असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या संशयित आरोपीचा चाळीसगाव पोलीस कसून शोध घेत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (वय – ५७) हे चाळीसगाव शहरात कामानिमित्त आले होते. त्यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले. मात्र चोरट्यांनी ही पिशवी पाळत ठेवून लांबवली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, योगेश बेलदार आदी तपास करीत आहेत.