मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल गोवर्धन राठोड (वय ३५ रा. टाकळी ता.मुक्ताईनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई उखीबाई, पत्नी रंजना, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी गावात सुनिल राठोड हा तरूण आईवडील, पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होता. मजूरी व खासगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ५ डिसेंबर रोजी सुनिल राठोड हा त्यांची दुचाकी दुरूस्ती करण्यासाठी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे गेलेला होता.
दुचाकीची दुरूस्ती करून तो रात्री ८.३० वाजता घरी परतत असतांना पुर्णाड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनिल हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.