मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कामावरून घरी परताना भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे तालुक्यातील घोडसगाव येथे घडली. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम राजू उंबरकार (वय २२) असे मयत तरुणाचे नाव आहे. मुक्ताईनगर शहरात वल्लभभाई पटेल नगरातील रहिवासी शुभम राजू उंबरकार हा पिंप्री अकाराऊत येथील पद्मश्री लॉन येथे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास तो कामावरून आपल्या घरी परत येण्यासाठी एमएच १९ डीएक्स ९४१२ या क्रमांकाच्या होंडा शाईन या दुचाकीने निघाला होता. तो घोडसगाव येथील उड्डाणपुलावर आला असता अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.
परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन रूग्णवाहिका बोलावली. येथून त्यांच्या मामांशी संपर्क करून याबाबतची माहिती देण्यात आली. कुटुंबियांनी तात्काळी अपघातस्थळी धाव घेऊन शुभम याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मयत युवकाचे मामा संतोष मधुकर सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.