जळगावच्या बांभोरी-वावडदा रस्त्यावर घटना, गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या चालकाने एका पादचाऱ्याला मागून जोराची धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, अपघात घडवून चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास बांभोरी-वावडदा रस्त्यावरील सुनील मराठे यांच्या सिमेंट दुकानासमोर घडली.


फिर्यादी सुनील शांताराम पाटील (वय ३२, रा. बिलखेडा, ता. जळगाव) हे आपल्या खाजगी कामानिमित्त वावडदा येथे पायी जात होते. सुनील मराठे यांच्या दुकानासमोरून रस्त्याच्या कडेने चालत असताना, मागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या बजाज प्लॅटिना दुचाकीने (क्रमांक: एमएच-१९-डीझेड-६०९६) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील पाटील यांच्या डाव्या हाताच्या कोपरला, मनगटाला, कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
दुचाकी चालक हृषिकेश सपकाळे (रा. जळगाव) याने अपघाताची माहिती पोलिसांना न देता किंवा जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









