दोन जखमी ; नेरी ते शेंदुर्णी दरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील नेरी ते शेंदुर्णी रस्त्यावर मंगळवारी दि. २६ मार्च रोजी रात्री खराब रस्त्यांमुळे दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
अमोल अंबादास वडर (वय २४ रा.शेंदुर्णी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो शेंदुर्णी गावात आई-वडील, चार भाऊ, बहीण यांच्यासह राहत होता. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान मंगळवारी दि. २६ मार्च रोजी रात्री १० वाजता सुमारास अमोल हा त्याचे मित्र सुदाम कोळी व पवन कोळी यांच्यासह शेंदुर्णीकडे दुचाकीवरून जात होता. तेव्हा नेरी ते शेंदुर्णी रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे.
तेथील खराब रस्त्यांमुळे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात अमोल वडर याला डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याच्यासह सुदाम व पवन कोळी यांनाही आजूबाजूच्या ग्रामस्थांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचार चालू असताना अतिदक्षता विभागात अमोल वडर याचा बुधवारी दि. २७ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
तर सुदाम कोळी व पवन कोळी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोलच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.