चोपडा तालुक्यातील वैजापूर शिवारात घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकी अडवून लाकडी बांबूने मारहाण करत दाम्पत्याला लूटण्याचा तिघांनी प्रयत्न केला. दुचाकीस्वारकाने न थांबता दुचाकी पळविल्याने चोरीचा प्रयत्न फसला. शनिवार दिनांक १० रोजी वैजापूर तेल्या घाटाच्या माथ्यावर ही घटना घडली. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भानुदास रामसिंग बारेला (वय ५५, रा. कर्जाणे ता. चोपडा) यांचा मुलगा अशोक बारेला तसेच त्याची पत्नी हे दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईई २८८७) ने कर्जाणे गावी जात होते. वैजापूर शिवारात तेल्या घाटाचे पूर माथ्यावर तीन संशयितांनी दुवाकी अडवित अशोक बारेला याच्या हाताच्या दंडावर लाकडी बांबूने मारहाण करत फ्रैक्चर केले. त्यानंतर त्याच्या पत्नीकडे संशयित वळले.
आदिवासी पावरी भाषेत बोलताना त्यांनी अंगावरील दागीने काढुन दे, तुम्हाला मारत नाही. असे म्हणाले. त्यामुळे हे लुटमार करणारे आहेत, असे लक्षात आल्याने अशोक बारेला याने पत्नीसह दुचाकी पळविली. व लुटारुच्या कचाट्यातून सुटका करुन वैजापूर गाठले. या प्रकरणी भानुदास बारेला यांच्या तक्रारीनुसार ईश्वर किसन डावर (रा. आसरापाणी ता. वरला), पप्पु जयमाल डावर, पवन आकाराम खरते-बारेला (दोन्ही रा. कुंड्या ता.वरला, म.प्र.) यांच्या विरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे हे तपास करीत आहेत.