नशिराबाद पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर २ वाहन शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दि. २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मध्यप्रदेशातून तिघांना खंडवा कारागृहात ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीना पोलीस कोठडी मिळाली आहे.
जळगाव-भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यासमोर चौधरी टोयोटा या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये चोरट्यांनी शोरूमच्या डिलिव्हरी सेक्शनमधील दरवाजा तोडून प्रवेश केला. मोठी रोकड नसल्याने त्यांना फक्त १० ते ११ हजार रुपये मिळाले. चोरीपेक्षा मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने शोरूमचे मोठे नुकसान झाले. लॉकर, ड्रॉवर, कॅबिनेट आणि इतर वस्तूंची नासधूस करण्यात आली.(केसीएन) हा संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तर दुसऱ्या घटनेत सातपुडा ऑटोमोबाईलमध्ये चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, तोडफोड करत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. चोरट्यांनी येथे तब्बल चार तास धुमाकूळ घातला. ते पहाटे चार वाजेपर्यंत शोरूममध्ये होते आणि हा संपूर्ण प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या घटनेत मध्यप्रदेशातील खंडवा कारागृहातून नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पथकाने संशयित आरोपी मेवालाल घिसिलाल मोहिते (वय ३०, रा. बोरगाव, मध्य प्रदेश) कमलेश उर्फ कालू मनालाल पवार (वय ४०, ग्राम रोसिया जि. खंडवा), अजय धूलजी चव्हाण (वय २२, रा. घटिया गराठे, मंदसौर) यांना दि. ८ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता अटक केली आहे.(केसीएन)सदर संशयित आरोपी हे बऱ्हाणपूर येथील शिकारपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटकेत होते. त्यांनी नशिराबाद येथील गुन्हा कबूल केल्याने त्यांना नशिराबादच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. सपोनि ए.सी.मनोरे यांचे मार्गदर्शनाने तपास अंमलदार पोहवा योगेश वराडे, सोबत पोहवा युनूस शेख, पोहवा गिरीश शिंदे, पोकॉ आरिफ तडवी, सागर बिडे यांनी कारवाई केली आहे.