चोपडा तालुक्यातील अडावदजवळ घटना, मयत भुसावळ तालुक्यातील रहिवासी
चोपडा (प्रतिनिधी) :- भरधाव दुचाकी व बोलेरो पीकअपच्या झालेल्या भीषण अपघातात भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील २ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अडावदनजीक असलेल्या कृषी विद्यालयाजवळ घडली. अपघातानंतर दोघांना तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. याठिकाणी पोहचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोलेरो चालक मनोज संजय पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज तुकाराम तायडे (वय ३६) व महिंद्र शांताराम दोडे (वय ३८) असे मृत तरुणांचे नाव आहे. महेंद्र कोळी याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ आहेत तर युवराज तायडे याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अडावदजवळ झालेल्या भीषण अपघातातील दोन्ही युवक भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील रहिवाशी आहे. दोन्ही युवक श्रावण सोमवार निमित्त बिलाट बाबाच्या दर्शनासाठी मध्य प्रदेश येथे जात होते. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची घटना समजताच गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी अडावद येथे धाव घेतली. अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भरत नाईक हे करित आहे. अपघाताचे वृत्त समजतांच गोजोरे गावावर शोककळा पसरली आहे.