खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशन तर्फे वर्धापन दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : येथील खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त शहरांमध्ये रविवारी दि. १४ रोजी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये वाहन दुरुस्तीची विविध तंत्रे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार आलेले नवीन कौशल्य याविषयी खान्देशातील दुचाकी गॅरेज चालकांनी विविध कंपन्यांच्या तंत्रज्ञाकडून प्रशिक्षण घेतले. दुचाकी दुरुस्तीची सेवा केवळ रोजगार नव्हे तर देशसेवा आहे असे त्यांनी सांगितले.
खानदेश टू व्हीलर टेक्निशन असोसिएशनने नुकतीच १० वर्षे पूर्ण केली. अकराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगर येथील संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद, नाशिकचे अध्यक्ष रवींद्र लोंढे, बुलढाणाचे अध्यक्ष किशोर पाटील, मलकापूरचे अध्यक्ष सोनाजी खर्चे, देऊळगाव गुजरी येथील शेख अन्सार, विविध कंपन्यांचे तंत्रज्ञ दीपेश यादव, वैभव सिंघाळे, लोकेश कोल्हे, आदित्य पगारिया, खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनचे अध्यक्ष अश्फाक मिर्झा, उपाध्यक्ष शेख मुश्ताक, सचिव अमीन शेख उपस्थित होते.
सुरुवातीला प्रस्तावनेमधून अशपाक मिर्झा यांनी कार्यशाळा घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत गॅरेज चालकांसाठी नवीन उपक्रम घेण्यात येतील असे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सय्यद चांद यांनी सांगितले की, प्रत्येक तंत्रज्ञाच्या मनात यंत्राबद्दल प्रेम, हातात कौशल्य आणि शिकण्याची जिद्द कायम असली पाहिजे त्यामुळे तुम्हाला उज्वल भविष्य मिळू शकेल. तर रवींद्र लोंढे यांनी सांगितले की, आपले कौशल्य अधिक विकसित करून देशाच्या विकासामध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे. त्यासाठी कायम अपडेट राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन संदीप सूर्यवंशी यांनी केले. आभार शरीफ बाबा यांनी मानले. कार्यशाळेमध्ये विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट्स आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहनांशी निगडित बाबी याबाबत प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचेही उद्घाटन मान्यवरांनी सकाळी केले. दिवसभर खान्देशातील विविध दुचाकी गॅरेज चालकांनी भेट देऊन कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यशाळेसाठी असोसिएशनचे खजिनदार शरीफ पिंजारी, आबिद बागवान, दस्तगीर पिंजारी, सय्यद अन्सार, अनिल पितळे, अशोक बन्सी, शरीफ मणियार, शेख कलीम, फिरोज मणियार, शेख निसार, मकसूद शेख आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचा खान्देशातील ४०० दुचाकी गॅरेज चालकांनी लाभ घेतला.
कार्यशाळेमध्ये मान्यवरांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेमध्ये सुझुकी कंपनीचे सिनिअर ट्रेनर वैभव शिंगाळे, नागपूर येथील हिरो कंपनीचे सीनियर ट्रेनर दीपेश यादव, यांच्यासह लोकेश कोल्हे व आदित्य पगारिया यांनी उपस्थित गॅरेज चालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, दुचाकी तंत्रज्ञाचे काम हे केवळ पैसे कमवण्याचे साधन नसून एक सेवा आहे. लाखो लोकांना तुम्ही त्यांच्या कामावर, त्यांच्या गावाला, गरजेच्या वेळी पोहोचण्यास मदत करतात. तुमच्याकडे ज्ञान आणि शिकण्याची कला असेल तर तुम्ही प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञान घडवू शकतात. दुचाकी तंत्रज्ञांना मोठ्या कंपन्यांच्या डीलरशिप मध्ये चांगला रोजगार आहे.
दुचाकी तंत्रज्ञाचे कौशल्य हे अपडेट राहिले पाहिजे. सतत शिकत राहिले तर तुम्ही ग्राहकांना महत्त्वाची सेवा प्रदान करू शकतात. शरीर बिघडले की डॉक्टर ते दुरुस्त करतात. त्याच पद्धतीने वाहन बिघडले की ते दुरुस्त करणारे डॉक्टर आपणच असतो याची जाणीव कायम ठेवा, असेही या मार्गदर्शकांनी दुचाकी तंत्रज्ञांना सांगितले.









