धरणगाव शहरातील अंबिका नगर परिसरात घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : येथील एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगरजवळ दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर पतीसह लहान मुलगी आणि दुसऱ्या दुचाकीवरील आणखी १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर येथे शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील किरण पुंडलीक मराठे (वय-३५, रा. बोरखेडा बुद्रुक) तर दुसऱ्या दुचाकीवरील राकेश दुपसिंग बारेला (वय-४५), शानुबाई राकेश बारेला (वय-३५) आणि त्यांची कान्हाबाई राकेश बारेला (वय-५, मुलगी रा.चाचपणी, दुधखेडा बलवाडी, मध्यप्रदेश) हे जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या महिलेवर धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
त्यांचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना रूग्णवाहिकेने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.