जळगाव प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील एका सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या ३ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहर आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यातील चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. जळगाव शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार केले. तपास सुरू असतानाच निरीक्षक गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक संशयित इसम शिरपूर परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून विकास चंपालाल बरडे (रा. अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. संशयित आरोपी विकास बरडे याची सखोल चौकशी केली असता, त्याने जळगाव शहरातील विविध भागांतून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून जळगाव शहर पोलीस ठाण्यातील २ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीला पुढील तपासासाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस हवालदार उमेश भांडारकर पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









