पारोळा तालुक्यातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : दुचाकी अपघाताच्या घटनेत तफावत आढळून आल्याने व खोटे पुरावे सादर करून पोलिसांची व न्यायालयाची फसवणूक केली म्हणून आयसीआयसीआय इन्शुरन्स कंपनीतर्फे पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील दळवेल गावांनजिक दि.२७ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४.३० वाजेचे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरुन जात असतांना दळवेल गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. परंतु इन्शुरन्स क्लेम दाखल करताना सदर युनिकॉन दुचाकी ही स्लिप झाल्याचे दाखविण्यात आल्याने या दोघांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे सदर आयसीआयसीआय कंपनीने सदर चौकशी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशी झाल्यानंतर कंपनीची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
त्यावरून अशोक मुकुंदा पाटील (वय ६२ वर्षे, व्यवसाय कन्सलटंट, रा. वलवाडी शिवार, देवपूर, धुळे) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात नाशिरखा चॉदखा पठाण (रा.न्याहळोद), शेख अमिन शेख साबोद्दीन (रा. न्याहळोद), मोटरसायकल मालक-सलिमखाँ मुनाफ पठाण (रा. उंदीरखेडा), राजीयाबी साबोद्दीन शेख यांच्याविरुद्ध संगनमत करून पोलीसांना खोटे पुरावे सादर करून पोलीसांची व न्यायालयाची तसेच भविष्यात नुकसान भरपाई मिळविण्याच्या उद्देशाने खोटा भरपाई दावा दाखल करून आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीची फसवणूक केली आहे. म्हणून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.