चोरट्यांना आळा घालण्याची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : गोलाणी मार्केट परिसरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरुच आहे. दिनांक २३ ते २७ जुलै या पाच दिवसात चोरट्यांनी चक्क तीन दुचाकी चोरुन नेल्या. या घटनांनी वाहनधारक धास्तावले आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
यमुना अशोक पाटील (वय ४९, रा. पंढरपूर नगर, जळगाव) यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीएन १४०३) ही शनिवार, २७ रोजी गोलाणी मार्केट येथे अपना ज्युस सेंटर समोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी लावली होती. (केसीएन)दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून ही दुचाकी लंपास केली. या प्रकरणी रविवार, २८ रोजी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल गजानन बडगुजर हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, मायटी ब्रदर्स समोर गोलाणी मार्केटच्या पार्किंगमध्ये रमेश मंगरेश मौर्या (वय २३, रा. हॅप्पी कॉलनी, ऑटोनगर, जळगाव) यांनी मंगळवार दिनांक २३ रोजी सकाळी ८ वाजता त्यांची दुचाकी (क्रमांक एमएच १९ एसी ०५६५) लावली होती. चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडून ती चोरुन नेली. रात्री अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शुक्रवार, २६ रोजी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
तिसऱ्या घटनेत सुरेश दर्शनलाल वालेचा (वय ४६, रा. सिंधीकॉलनी) हे व्यावसायिक आहेत. शनिवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ७ वाजता ते त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ सीबी ४३१५) ने शहरात आले. (केसीएन)मायटी ब्रदर्स समोर गोलाणी मार्केट विंगमध्ये त्यांनी ही दुचाकी लावली होती. रात्री ते दहा वाजता दुचाकी घेण्यासाठी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी शनिवार, २७ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच दिवसात गोलाणी मार्केट परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.