नाकातून सतत पाणी येण्याच्या समस्येने रुग्ण झाला होता हैराण
दुर्मिळ आजारावर दुर्बिणीद्वारे लिकरिपेयर शस्त्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नाकातून सतत पाणी येण्याच्या समस्येचे अचूक निदान डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील कान नाक घसा तज्ञांनी केले असून दुर्बिणीद्वारे लिकरिपेअर शस्त्रक्रिया करुन रुग्णावर यशस्वी उपचार शक्य झाले. एक लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला हा त्रास होत असल्याचे नाक-कान-घसा विभाग तज्ज्ञांनी सांगितले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील कान नाक घसा विभागात एक ५५ वर्षीय रुग्ण नाकातून पाणी येत असल्याची तक्रार घेऊन आला होता. रुग्णाच्या आजाराची पार्श्वभूमी जाणून घेतली असता, रुग्णाची कुठलीही सर्जरी याआधी झाली नव्हती तसेच कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नव्हता तरीदेखील त्याच्या एका नाकपुडीमधून खाली झुकल्यावर सारख पाणी येऊन रुमाल ओले होवून बदलावे लागत होतेे. त्याच्या काही तपासण्या येथे करुन घेण्यात आल्यात. सीटी सिस्टोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार नाकातून येणारे पाणी हे मेंदूतील नलिकेतून आपोआपच येत होते. या आजाराला सीसेफ रायनोरीया असे संबोधले जात असून हा आजार दुर्मिळ आहे. त्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला इएनटी सर्जन डॉ.अनुश्री अग्रवाल यांनी दिला.
रुग्णाने देखील शस्त्रक्रियेस संमती दिली. इएनटी विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.तृप्ती भट यांनी भुलतज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.शीतल यांच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली. निवासी डॉ.रितू रावल, डॉ.चारु, डॉ.जान्हवी, डॉ.बासू यांनी रुग्णाची काळजी घेत उपचार केले तसेच नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले. एक लाख लोकांमधून एका व्यक्तीस ही समस्या निर्माण होते. अशा दुर्मिळ आजारावर डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. रुग्ण एका महिन्याने फॉलोअपला आला असता त्याने डॉक्टरांचे आभार मानले.
—–
सीसेफ रायनोरिया हा एक दुर्मिळ प्रकारचा आजार आहे. यात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यास कमी जोखीम असते व त्यास कमी वेळ लागतो. ही सुविधा येथे उपलब्ध आहे. अशाप्रकारची शस्त्रक्रिया येथे पहिल्यांदाच झाली.
– डॉ.अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख
कान नाक घसा विभाग