मानसोपचार विभागातील टीमचे यश,तंत्रज्ञानामूळे १५ दिवसात लक्षणीय सुधारणा
जळगाव (प्रतिनिधी):- मानसिक आजारामुळे त्रस्त असलेल्या २६ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आधुनिक ईसीटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले असून केवळ १५ दिवसांत त्याची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. अनेक वर्षे मानसिक त्रास सहन करणार्या या तरुणाला पुन्हा सामान्य आयुष्याकडे परतण्याची आशा निर्माण झाली आहे.
रावेर तालुक्यातील मयूर नामक २६ वर्षीय तरुणाला मागील सुमारे पाच वर्षांपासून मानसिक आजाराची लक्षणे जाणवत होती. त्याला सतत चिडचिड होणे, कोणावर तरी संशय घेणे, अनावश्यक भीती वाटणे, घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करणे तसेच एकटे राहण्याची सवय लागणे अशी अनेक लक्षणे होती. कालांतराने त्याची अवस्था अधिक गंभीर होत गेली. कुटुंबीयांनी त्याच्यावर विविध ठिकाणी उपचार केले, अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता.


डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार
अखेरीस कुटुंबीयांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात त्याला दाखल केले. येथे मानसिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची सखोल तपासणी करून त्याच्या आजाराचे स्वरूप समजून घेतले. औषधोपचारांसह आधुनिक ईसीटी उपचार पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईसीटी ही गंभीर मानसिक आजारांमध्ये वापरली जाणारी आधुनिक व प्रभावी उपचार पद्धती असून अत्यंत सुरक्षित पद्धतीने दिली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि आवश्यक वैद्यकीय काळजी घेत ही प्रक्रिया पार पडते. रुग्णाला भूल देऊन नियंत्रित पद्धतीने उपचार दिले जातात, त्यामुळे रुग्णाला कोणताही त्रास होत नाही. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणावर ईसीटीचे काही सत्रे घेण्यात आली. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. केवळ १५ दिवसांत त्याच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसू लागले. चिडचिड कमी झाली, भीती व संशय कमी झाले तसेच तो कुटुंबीयांशी संवाद साधू लागला. आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा खूप सुधारली असून तो सामान्य जीवनाकडे परतत आहे.
– डॉ. देवांश गणात्रा, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.








