विश्वजीत चौधरी
जळगाव – सरकारी रुग्णालय म्हटले की, ते गरीबांचे रुग्णालय. रुग्णांच्या हालअपेष्टा… डॉक्टर,परिचारिकांवर अंकुश नाही… बेपर्वा कारभार… सुरक्षा वाऱ्यावर… सुविधांच्या नावाने कायम बोंब… असे चित्र साधारणपणे देशात अनेक ठिकाणी दिसून येते. याला मोजकी सरकारी रुग्णालये अपवाद ठरतात. अशातीलच एक अपवाद ठरणारे जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालय. येथे सुमारे तीन महिन्यांपूर्वी असेच अनागोंदीचे, बेपर्वा कारभाराचे वातावरण होते. हे वातावरण बदलवण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केवळ १०० दिवसात करून दाखविले आहे. रविवारी २० सप्टेंबर रोजी त्यांना पदभार घेऊन १०० दिवस झाले. अतिशय अविश्वसनीय बदल येथे घडले व घडून येत आहे.


भुसावळ येथील मालती नेहेते या करोनाबाधित बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह १० जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला होता. या बेपर्वा कारभारामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह ५ जण निलंबित झाले होते. तसेच मृत्यूदर देखील वाढला होता. प्रशासनाचे नियंत्रण राहिले नव्हते. त्यामुळे जळगावचे नाव देशपातळीवर कुप्रसिद्ध झाले होते. एखाद्या खमक्या अधिकाऱ्याची येथे आवश्यकता होती. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी राज्य शासनाने नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. मुळचे कोल्हापूर येथील रहिवासी मात्र शिस्त, प्रामाणिकपणा, पारदर्शक कारभाराची ओळख असलेले डॉ. रामानंद यांनी १२ जून रोजी पदभार हाती घेतला. कामकाज हाती घेतल्यावर डोक्याला हात मारावे असेच चित्र त्यांना दिसले. डॉक्टर, परिचारिका, वोर्ड्बोय यांची कुठलीच यादी नाही. कोण कुठे जातो काही ताळमेळ, सुसूत्रता नाही. सुरक्षेचे तीनतेरा वाजलेले.

हे सर्व चित्र डॉ. रामानंद यांनी बदलले. थ्री एम अर्थात मनी, मटेरियल, मॅन म्हणजेच मनुष्यबळ, सुविधा आणि उपलब्ध निधी यानुसार सातत्याने आढावा घेत नियोजनबद्धतेने काम केले. डॉक्टरांसह परिचारिका, वोर्ड्बोय यांचे मनोबल वाढविले. सुरक्षाव्यवस्था कडक केली. कोणी दोषी आढळला तर त्याला शांत भाषेत समजावून दुरुस्त केले. निधीची कमतरता पडू दिली नाही. शासकीय निधीसाठी सतत पाठपुरावा आणि अनेक सामाजिक संस्थांची मदत यामुळे आज कोविड रुग्णालय समृद्ध झाले आहे. जे रुग्ण बरे झाले त्यांनी कृतज्ञता म्हणून रुग्णालयाला उपयोगी भेटवस्तू दिल्या.

डॉ.रामानंद यांनी रुग्णाच्या आजाराचे निदान व त्यानुसार उपचार यावर भर दिला. वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. दत्तात्रय बिराजदार, प्रशासन प्रमुख म्हणून डॉ. मारुती पोटे यांच्यासह डॉ. विजय गायकवाड, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. संजय बनसोडे, डॉ. पटेल यांच्यासह अनुभवी डॉक्टरांचे रुग्णालयात नेतृत्व उभारून टीम तयार केली. पी.एम.केअर फंडातून व्हेन्टीलेटर, मंत्री आदित्य ठाकरे यांकडून ऑक्सिजन कोन्सट्रेटर, रोटरी क्लबकडून ऑक्सिजन सुविधा यासह विविध संस्थांकडून फ्रीज, पंखे, ब्लॅंकेट रुग्णालयाला मिळाल्या.

रुग्णालयातून नवजात बालकांसह लहान बालके आणि वयोवृद्ध रुग्ण देखील करोनामुक्त होऊन घरी परतले. अनेक करोनाबाधित महिलांची गुंतागुतीची असलेली सुखरूप प्रसूती त्यांच्या काळात झाली. रुग्णांसह नातेवाईकांत विश्वास निर्माण झाला आहे. राज्यातील बेड साईड असिस्टंट म्हणजे रुग्ण सहाय्यक हा पहिलाच प्रयोग डॉ. रामानंद यांनी राबविला. या रुग्ण सहाय्यकाना मानधन देखील मिळवून दिले. या सहाय्यकांमुळे रुग्णांना मानसिक आधार मिळाला.
अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी भविष्यात आणखी लोकाभिमुख कार्य करण्याचा निश्चय केसरीराजकडे बोलून दाखवला आहे. प्रत्येक रुग्ण बरा होऊ शकतो, त्यासाठी योग्य उपचार, वेळेचे पालन, तत्काळ निदान आणि सकारात्मक मानसिकता हवी असेही ते म्हणाले.
तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी आधिष्ठात्यांचे प्रतिनिधी म्हणून विशेष कार्य अधिकारी नेमणार आहे. तसेच भविष्यात डॉक्टर, परिचारिका, वॊर्डबॉय यांच्यासाठी गणवेश दिला जाणार आहे. तसेच बेड मॅनेजमेंट सिस्टीम देखील बदलवली असल्याचे ते म्हणाले.
ठळक बाबी
* ‘बेड साईड असिस्टंट’ चा राज्यातील पहिलाच प्रयोग राबविला
* बेड साईड असिस्टंटमुळे रुग्णांना मिळाला आधार
* एकूण १० ऑक्सिजन बेडचे आज ३५६ ऑक्सिजन बेड
* भविष्यात आणखी १४० ऑक्सिजन बेडचे २८ रोजी लोकार्पण
* डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांच्यात योग्य समन्वय राखून कार्य
* कडक व पारदर्शी सुरक्षा व्यवस्था प्रवेशद्वारावर उभारली
* स्वत:च्या कक्षातून सीसीटीव्हीद्वारे रुग्णालयावर कायम नजर
* रुग्णालयाच्या कक्षात दिवसभरात व रात्रीदेखील अचानक राउंड घेतात
* रुग्णांशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या
* व्हेन्टीलेटर, ऑक्सिजन पुरवठाचा आढावा
* टेलीकॉलिंगद्वारे रुग्णांना साधता येतो नातेवाईकांशी संवाद
* संध्याकाळी दिवसभरातील मृत्यूंचा आढावा घेतात
* विविध समित्या नेमल्या ; त्याद्वारे कारभारात सुसूत्रता आणली
* महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांना मदत मिळवून दिली
* राज्यातील वरिष्ठ अधिकार्याशी संपर्क साधत कायम मार्गदर्शन घेतात
* पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची पाहणी व सूचना
* डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. विजय गायकवाड, डॉ.मधुकर गायकवाड, डॉ.संजय बनसोडे हे प्रमुख शिलेदार







