जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद पुलावर गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास झालेल्या अपघातग्रस्त रुग्णासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल देवदूत ठरले. अपघातस्थळी जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला तातडीने उपचार मिळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी मित्तल यांनी डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात फोन केला. यावेळी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने देखील जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलेल्या फोनला तितक्याच तत्परतेने प्रतिसाद देऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेतले. जिल्हाधिकार्यांची समयसुचकता व डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाची तत्परता यामुळे तरुणाचा पुर्नजन्मच झाला.
रावेरहून पूर परिस्थितीचा पाहणी दौरा आटोपून येत असतांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना नशिराबाद पुलावर दुचाकीच्या बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला तरुण रूपेश कमलाकर सोनवणे (वय-३२ रा.प्रिंपाळे, जळगाव) दिसला. जिल्हाधिकार्यांनी घटनास्थळी त्यांचे वाहन थांबवत, त्यांच्या मागून येणार्या वाहतूक पोलीस शाखेच्या इंटर सेप्टर व्हॅनमध्ये तरूणांला तात्काळ भरती केले. जवळचे रूग्णालय असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रूग्णालयात दाखल केले. रूपेश च्या नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत तसेच प्रकृतीची माहिती येईपर्यंत जिल्हाधिकारी रूग्णालयात मध्यरात्रीपर्यंत स्वतः थांबून होते. अपघातात रूपेश सोनवणे ला मेंदूला जबर इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीतच त्याला दवाखान्यात दाखल केल्यामुळे तरूणांचा जीव वाचला आहे. जिल्हाधिकार्यांनी रूग्णालय वाहिकेची प्रतिक्षा न करता त्यांच्या मागून येणार्या वाहतूक शाखेच्या वाहनात तरूणांला भरती करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. रूग्णालयाचे हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांमधील माणूस जागा झाला आणि ताबडतोब यंत्रणेला आवश्यक सूचना देत तयारीला लागायला सांगितले.रूग्णालयात येईपर्यंत दहा मिनिटांच्या कालावधीत जिल्हाधिकार्यांनी स्वतः रूग्णालय वैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क करून ठेवला. त्यामुळे तरूणांच्या उपचारांसाठी वैद्यकीय चमू सज्ज होता. येथे वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे, डॉ श्रीधर, डॉ. मैत्रेयी, माधुरी, अश्लेषा आणि प्रगती सिस्टर या टीमने ताबडतोब सीटीस्कॅन करून घेतला. रिपोर्टच्या अनुसार योग्य दिशेने त्या रूग्णांवर उपचार सूरू झाल्याने आता रूग्ण धोक्याच्या बाहेर आहे. जिल्हाधिकारी आणि डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या तप्तरतेने सदर तरूणाचे प्राण वाचले.
यांनी केली मदत
तरूणांचा जीव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक विजय पाटील, गणेश वाटे, मिलिंद पाटील, दिपक पाटील, सचिन मोहिते, नागरिक पवन भोई व डॉ.रितेश पाटील यांच्यासह डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील प्रशासन अधिकारी आशिष भिरुड यांची मदत झाली.