पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तरवाडे येथे नुकतेच शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले . मूलभूत कामांसाठी प्रतिबद्धतेची ग्वाही यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांनी दिली .
समाजकारणातून राजकारण करीत असतांना नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडून गरजेची कामे व्हावीत हाच ध्यास घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने राजकारणात विकासकामांची वाटचाल केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करतांना आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल तो दृष्टिकोन ठेवत कामे करण्याचा प्रयत्न केला. निधी आणताना यशही मिळाले. तरवाडे परिसरासह इतर गावांना विकास कामे करण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ.हर्षल माने यांनी दिले, तरवाडे येथे शव पेटीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राजपूत करणी सेना राज्य अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जि. प. सदस्य हिम्मतराव पाटील, मोहाडीचे सरपंच रामचंद्र राजपूत , सावखेडाहोळचे हरसिंग राजपूत ,सावखेडा होळचे वि. का सो. चेअरमन विलास पाटील, बोदर्डेचे सरपंच जितेंद्र राजपूत, भोकरबारीचे सरपंच राहुल राजपूत, सांगवीचे सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच गुलाब पाटील , पत्रकार योगेश पाटील , मुंदाणे येथील पो. पा . एकनाथ पाटील, आडगावचे सरपंच सागर पाटील, जोगलखेडेचे सरपंच भरत पाटील ,आडगावचे पोलीस पाटील मनोहर पाटील, तरवाडेचे सरपंच सुमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी डॉ. माने यांच्या मतदार संघातील कामांचे कौतुक करून तरवाडे व आजूबाजूच्या परिसरासाठी आवश्यक शवपेटी डॉ.माने यांनी देऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर केली असल्याचे सांगितले.
डॉ. माने म्हणाले की, चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदार संघात रस्ते , स्मशानभूमी व गरजू कामांना न्याय दिला. यापुढेही जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा भगीरथ पुढे नेण्याचा मानस असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात तरवाडेचे सरपंच सुमित राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व त्यांना राजपूत करणी सेनेचे तालुकाध्यक्षपद देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.हर्षल मानेंसह सुमित राजपूत यांच्या कामांचे कौतुक बाळासाहेब पाटील, रामचंद्र राजपूत, प्रविण पाटील, हिंमत पाटील, रविदास महाराज, विलास पाटील, आदी मान्यवरांनी केले, सुमित पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.