जळगाव जीएमसीच्या अस्थीव्यंगोपचारशास्त्र विभागाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अस्थिव्यगोपचार शास्त्र विभागांतर्गत ६४ वर्षांच्या वृद्धावर दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया (टोटल नी रिप्लेसमेंट) यशस्वीपणे पार पडली. या रुग्णाला नुकताच अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांचे हस्ते डिस्चार्ज कार्ड देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
उत्तमसिंग पाटील (वय ६५, रा. व्यंकटेश नगर, जळगाव) रुग्ण हा गुडघेदुखीने मागील ५ वर्षांपासून त्रस्त असून बऱ्याच ठिकाणी औषधोपचार व भौतिकोपचार घेऊनदेखील सदर रुग्णाला आराम मिळत नव्हता. तसेच रुग्णाला दैनंदिन कामे करणे शक्य होत नव्हते. रुग्ण व्हीलचेअरवर मागील ६ महिन्यापासून होता. बाह्यरुग्ण विभागात सदर रुग्ण तपासणीकरीता आला असता डॉ.राजकुमार सूर्यवंशी व डॉ.अमोल पाटील यांनी त्याला गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रुग्णाला दाखल करून घेत सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. रुग्णाला दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी लवकर उपलब्ध करून दिले.
यामुळे रुग्णाच्या दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच अस्थीव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.राजकुमार सूर्यवंशी, सहयोगी प्रा. डॉ.राजेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अमोल पाटील, डॉ.निलेश पाटील, डॉ.पंकज घोगरे, डॉ.सुमित पाटील, डॉ. हनुमंत काळे, डॉ.साईनाथ, डॉ. तोसिफ, डॉ.अमोल कुऱ्हे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेसाठी रूग्णास कोणताही खर्च करावा लागला नाही. वैद्यकीय पथकाच्या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी टीमचे अभिनंदन केले. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे आभार मानले.