अमळनेर तालुक्यातील लोण फाट्यावरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लोण फाट्यावर बसची वाट पाहणाऱ्या दोन मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १७ रोजी दुपारी घडली आहे. मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोण बु. येथे मामाकडे आलेल्या तमन्ना सिद्धार्थ भालेराव (वय ११) व अर्चना सिद्धार्थ भालेराव (वय ७) ह्या आपल्या गावी चावलखेडा ता. धरणगाव येथे जाण्यासाठी आई, बहीण व मामासह दिनांक १७ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान लोण फाट्यावर बसची वाट पाहत होते. (केसीएन) तेव्हा अमळनेरकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने (क्र. एमएच १९ बीयु ३५५३) अर्चना व तमन्ना या दोघांना धडक दिली. धडकेनंतर कार कापसाच्या शेतात बांधावरून पलटी झाली.
त्यावेळी अर्चना व तमन्ना यांना उचलले असता तमन्ना हिच्या डोक्याला, पायाला व शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या व ती काहीच बोलत नव्हती. तसेच अर्चना हीचा पाय मोडला होता. त्यावेळी सदर चारचाकीतील चालकासही मार लागल्याने तो त्याठिकाणी आला. दोन्ही मुली आणि त्या चालकाला अमळनेरकडे जाणाऱ्या वाहनात टाकून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
त्याठिकाणी तपासून तमन्ना हिला डॉक्टरांनी मयत घोषित केले. अर्चना हिच्या पायाला फॅक्चर झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहे. त्यादरम्यान सदर वाहन चालक पळून गेला आहे. याप्रकरणी लोण बु. येथील अनिल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत ईशी हे करीत आहेत.