जळगाव शहरात मालधक्क्यावर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मालधक्क्यावर काम करताना एका तरुणाचा डोक्यात लोखंडी हुक पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कैलास रमेश माळी (वय २७, रा. पाळधी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो लहान भाऊ, काका यांचे सह पाळधी येथे राहत होता. मालधक्क्यावर काम करून उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, कैलास हा नेहमीप्रमाणे बुधवारी दि. १८ रोजी कामावर हजर झाला होता. मालधक्क्यावर क्रेनच्या वाहनावर काम करताना अचानक लोखंडी हुक तुटला आणि कैलासच्या डोक्यात पडला. त्यामुळे कैलासला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
आजूबाजूच्या कामगारांनी कैलास याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी हमाल कामगारांनी व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली होती. होतकरू व कष्टाळू कैलासच्या जाण्याने पाळधी गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.