विश्लेषण : पाचोरा-भडगाव मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा प्रभावशाली उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने रंगतदार लढत नागरिकांना पाहायला मिळत आहे. मात्र खरी लढत ही महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच दिसून येत आहे. दिवंगत आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या व पुतणे या वारसांमध्येच टक्कर असून बहीण-भाऊत जनता कोणाला कौल देते हे शनिवारी दिसून येणार आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात मागील पंचवार्षिकला २०१९ साली शिवसेनेचे किशोर पाटील यांना ७४ हजार ७४२, अपक्ष अमोल शिंदे यांना ७३ हजार ६१५ मते तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वाघ यांना ४४ हजार ४२२ मते मिळाली होती. यंदा शिवसेनेचे दिवंगत नेते आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली नरेंद्र सूर्यवंशी आणि आर. ओ. पाटील यांचे पुतणे तथा महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवार अमोल पंडित शिंदे, दुसरे अपक्ष उमेदवार माजी आ. दिलीप ओंकार वाघ यांचेसह महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रताप हरी पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ उमेदवार यंदा निवडणूक लढवीत असून रंगतदार लढती मतदारांना बघायला मिळत आहे.
अपक्षांचा प्रभाव तालुक्यात असल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात होणारे मतांचे विभाजन नेमका कुणाला फटका देऊ शकतो हे निकालानंतर दिसून येणार आहे. पाचोरा मतदारसंघातील निवडणूक ही गिरणा नदीवरील बलून बंधारे, नदीजोड प्रकल्प, पाणीपुरवठा, विकास कामे अशा विविध मुद्द्यांवर गाजत आहे. मतदार संघात आ. किशोर पाटील हे गेल्या दहा वर्षापासून दोन टर्म आमदार असून तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. किशोर पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतल्या असून अभिनेता गोविंदा यांचा रोड शो झाला आहे.
तर वैशाली सूर्यवंशी यांच्यासाठी उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे,सुषमा अंधारे यांच्या सभा पार पडल्या आहेत. मतदारसंघात एकूण ३३ हजार ८६० मतदार असून यात पुरुष १ लाख ७२ हजार ६१, महिला १ लाख ६१ हजार ७९० तर तृतीयपंथी ९ आहेत. पाचोरा- भडगाव मतदार संघात झालेल्या सभांमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. बुधवारी होणाऱ्या मतदानात जनतेचा कौल नेमका कोणत्या उमेदवाराकडे जातो याकडे सर्व जिल्ह्यातून लक्ष लागून आहे.