भुसावळ न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
भुसावळ (प्रतिनिधी) : – दीपनगर प्रकल्पातील बी.टी.पी.एस. प्रोजेक्ट येथून के.एस.एल. टेक्नोक्रॅटस कंपनीच्या मालकिचे ६८ लाख ८६ हजार ७५८ रुपये किंमतीचे कॉपर बार लांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांकडे दाद मागितल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. भुसावळ न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा २४ तास पहारा या प्रकल्पात आहे. शिवाय अवजड बार चोरी करून नेण्यासाठी ट्रकसारख्या मोठ्या वाहनाची आवश्यकता असल्याने ही चोरी झाली कशी? शिवाय यात कोण कोण सहभागी आहे? असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांकडून उपस्थित झाला आहे. दीपनगर येथील बी.टी.पी.एस. प्रोजेक्ट येथून के.एस.एल. टेक्नोक्रॅटस या कंपनीने मौल्यवान ईलेक्ट्रीक पॅनल्स, ट्रान्सफार्मरची उभारणी व कमीशनींगचे काम सुरू असताना दिनांक ३० मार्च २०२३ ते १८ जानेवारी २०२४ दरम्यान बी.टी. पी.एस. प्रोजेक्टमधून ६८ लाख ८६ हजार ७५८ रुपये किंमतीचे कॉपर बस बार अज्ञात चोरट्यांनी लांबवले.
के.एस.एल. टेक्नोक्रॅटस, तेलंगना या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रावुला राजेंद्र प्रसाद इसराईल (आंध्रप्रदेश) यांनी भुसावळ येथील ज्युडी मॅजी वर्ग-१ यांच्या न्यायासनापुढे भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात संदर्भात अर्ज दाखल केला. दिनांक ७ जानेवारी भुसावळ येथील न्यायासनाने भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. तक्रारदारातर्फे अॅड. राजेंद्र टी. राय (भुसावळ) यांनी काम पाहिले.