“देशी”ची विक्री घटली, जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन विक्रीत वाढ
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यात विदेशी दारू विक्रीत १४ टक्के, बिअर १३ टक्के व वाईन १६ टक्के वाढ झाली असून देशी दारू विक्रीत २ टक्के घट झाली आहे. या दारू विक्रीतून महसूलात ३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिली आहे. दारूविक्रीत वाढ झाल्याचे दिसून आल्याने समाजमन चिंतीत झाले असून दारू पिणाऱ्यांमुळे हिंसा होणे, घरात कुटुंबियांना त्रास अशा बाबींनाही सामोरे जावे लागत आहे.
जळगाव जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या मागील वर्षाच्या सहामाही दारू विक्री व महसूलाच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्याच्या विदेशी, बिअर व कालावधीत दारू विक्रीत वाढ झाली आहे. तर देशी दारू विक्रीत २ टक्के घट झाली आहे. महसूलात ३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दारू विक्रीतून शासनाला या सहामाहीत ५ कोटी ४७ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत यावर्षीच्या सहामाहीत महसूलात १ कोटी ३८ लाखांची वाढ झाली आहे.
यामध्ये यंदाच्या या सहामाहीत ४९ लाख ७४ हजार २३ लीटर देशी दारू विक्री झाली आहे. २०२२ यावर्षी याच कालावधीत ५० लाख ५० हजार २४६ लिटर देशी दारू विक्री झाली होती. तसेच यंदाच्या या सहामाहीत ३१ लाख ८३ हजार ५४२ लीटर विदेशी दारू विक्री झाली आहे. २०२२ यावर्षी याच कालावधीत २७ लाख ९१ हजार १८३ लिटर विदेशी दारू विक्री झाली होती. तसेच या सहामाहीत ३६ लाख ६२ हजार ३२५ लीटर बिअर दारू विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३२ लाख ३७ हजार ८८९ लिटर बिअर दारू विक्री झाली होती. तर या सहामाहीत वाईन ५६ हजार ३५९ लिटर विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ४५ हजार ९३६ वाईन दारू विक्री झाली होती.