भुसावळ रेल्वे विभागातील सर्व स्टेशनांवर प्रवाशांना लाभ
जळगाव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ विभाग डिजिटल पेमेंटच्या पद्धतींचा वापर करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे आणि आपल्या प्रवाशांना सुलभ आणि अधिक कार्यक्षम सेवा सुनिश्चित करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने पुढे जाताना भुसावळ विभागातील सर्व आरक्षण कार्यालये तसेच अनारक्षित बुकिंग कार्यालयाच्या सर्व काउंटरवर क्यूआर कोड डिव्हाइस स्थापित केले गेले आहेत. रेल्वे प्रवाशांना तिकीट भाडे भरण्यासाठी क्यूआर कोड डिजिटल माध्यमाची सुविधा पुरविली जात आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत भुसावळ विभागातील सर्व स्टेशनांवरील आरक्षित व अनारक्षित तिकीट काउंटरवर क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे तिकीटाचे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
रेल्वे प्रवाशांना तिकीटाचे पेमेंट भरण्यासाठी यूटीएस मोबाईल ॲप, ATVM, POS आणि UPI यांसारख्या डिजिटल पेमेंटच्या विविध पर्यायांचा आधीपासूनच लाभ घेता येत आहे. या प्रकारच्या डिजिटल पेमेंट प्रणालीला अधिक उपयुक्त आणि सुलभ बनविण्याच्या उद्देशाने भुसावळ विभागाने या सुविधेचा विस्तार केला आहे. ही नवीन डिजिटल पेमेंट प्रणाली क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीटाचे पेमेंट करण्यास प्रवाशांना आता अधिक सोपी होईल. याच्या माध्यमातून कोणताही प्रवासी कोणत्याही अडचणीशिवाय आणि सुलभपणे आपले तिकीटाचे पेमेंट करू शकतो.
हा उपक्रम रेल्वे प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुगम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एक प्रोत्साहन आहे, तसेच याच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटसाठी सोपे आणि सुरक्षित पर्याय प्रदान केले जात आहेत. भुसावळ विभागाने प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी तिकीटाचे पेमेंट करण्यासाठी डिजिटल पद्धतीने क्यूआर कोडचा वापर करावा.