जळगाव (प्रतिनिधी )- भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या दुदैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सागर अरूण सरोदे (वय-३०) रा. श्रीकृष्ण नगर, जळगाव असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर सरोदे हा तरूण आपल्या आईवडील आणि मोठ्या भावासह श्रीकृष्ण नगरात राहत असून दोन्ही भाऊ शहरातील सुभाष चौक परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सागर हा गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे घरात काहीही न सांगता निघून गेला होता. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला . जळगाव रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्याजवळील कागदपत्राच्या आधारे सागरची ओळख रेल्वे पोलीसांकडून ओळख पटविण्यात आली. खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला मयताच्या पश्चात आई उषाबाई, वडील अरूण नथ्थू सरोदे, मोठा भाऊ हर्षल आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामराय इंगळे आणि किशोर पाटील हे करीत आहे.