पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव / रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बोरखेडा येथे चार बालकांचे निर्घुण हत्याकांड प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल गुन्ह्यात लैगीक अत्याचार व बालक संरक्षण कायद्या अंतर्गत वाढ करण्यात आली असून तपासासाठी ४ पथके नियुक्त करण्यात आल्याचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ.प्रतापराव दिघावकर यांनी आज दि. १८ रोजी सायंकाळी रावेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच संशयित आरोपींनी तपासात दिलेली माहितीमध्ये विसंगती असून सत्यता शोधण्याचे काम पोलीस करीत आहे, असेही ते म्हणाले.
रावेर शहरालगत असलेल्या बोरखेडा रस्त्यावर शुक्रवारी चार बालकांची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. याबाबत रविवारी सायंकाळी पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिघावकर यांनी माहिती देताना सांगितले की, गुन्हा क्र. 188 मध्ये कलम 376 (अ) व 452 लैंगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 कलमान्वये वाढ करण्यात आली आहे. परिस्थितीजन्य पुरावे आणि मिळालेली माहिती या अनुशंगाने चार पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. ७ ते ८ संशयित ताब्यात घेतले असून संशयितांची उलट तपासणी सुरु आहे. संशयितांनी दिलेली माहिती तपासण्याचे काम सुरु असून, तपासात नवीन माहिती समोर येत आहे. तांत्रिक, वैज्ञानिक अशी विविध पथके काम करीत असून परिस्थिजन्य पुरावा आणि आलेली माहिती यावरून बलात्काराचे कलम आणि पॉक्सो अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आले आहे.
तसेच, घटनाक्रम सांगा असे विचारले असता आयजी दिघावकर यांनी, घटनाक्रम अजून समजलेला नाही असे सांगितले. यावेळी तीन दिवस झाले तरी घटनाक्रम समोर येत नसेल तर, तपास कोठे चालू आहे, या प्रश्नावर मात्र दिघावकर यांनी, विविध मुद्यांवर तपास सुरु असल्याचेच पुन्हा सांगितले. पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा,उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिगळे, पोलीस निरीक्षक बापू रोहोम आदी उपस्थित होते.