विभागप्रमुखांसोबत घेतली बैठक
जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाने ज्ञानेश्वर ढेरे यांची जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी शुक्रवार दि. ७ जून रोजी महापालिकेत येऊन प्रभारी आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडून आयुक्त तथा प्रशासकपदाचा पदभार स्विकारला. आयुक्त ढेरे यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत बैठक घेत कामकाजाची माहिती करून घेतली.
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी असलेले ढेरे यांनी यापूर्वी कोल्हापुर, ठाणे, पिंपरी चिंचवड याठिकाणी महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. तर धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. ते मूळचे सोलापूरच्या सांगोला या गावचे रहिवासी आहेत.
स्वच्छता, पाणी पुरवठा आणि वृक्षारोपणावर भर देणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले. जळगाव शहर हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासोबतच स्वच्छतेवरही भर देणार आहे. शहरात अमृत योजना राबविण्यात येत आहे. त्याव्दारे सर्वाना पाणी पुरवठा करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.