जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव ते भुसावळ दरम्यान धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येणार असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सध्या सुरू आहे.


अयोध्या येथील रहिवासी आनंद मोर्या हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झेलम एक्सप्रेसने प्रवास करत होते. जळगाव ते भुसावळ दरम्यान प्रवास सुरू असताना, अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग लंपास केली. या बॅगेत १,६५,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. मोर्या यांनी सुरुवातीला इटारसी रेल्वे पोलिसात ‘शून्य’ क्रमांकाने तक्रार दाखल केली होती, जी नंतर पुढील तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. सदर चोरी जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन आणि सोनू जयसिंग बागडे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी फातेमा नगर परिसरातून समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (वय २१) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सध्या त्याला पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांचा समावेश होता.









