भुसावळ रेल्वे स्थानकाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील इंद्रप्रस्थ नगरात ईश्र्वर मोतीराम ठाकूर (वय ५८, रा. इंद्रप्रस्थनगर) हे वास्तव्यास असून ते महापालिकेतील मार्केट वसुली विभागात नोकरीस होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.(केसीएन)शनिवारी दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते रेल्वेने भुसावळकडे जात असतांना रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. ही घटना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.
याठिकाणी त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांनी ओळख पटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच भुसावळ येथे धाव घेतली. जखमी ईश्र्वर ठाकूर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.(केसीएन)परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.