एरंडोल तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ, शेकडो समर्थकांसह भाजपच्या वाटेवर
एरंडोल (प्रतिनिधी) : येथील माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, वैद्यकीय कक्ष उपजिल्हा समन्वयक विकी खोकरे,संजय महाजन,अनिल महाजन यांचेसह शेकडो शिवसैनिकांनी गुरूवारी २७ फेब्रुवारी रोजी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे सामुहिक राजीनामे देऊन उबाठा शिवसेना गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला.दशरथ महाजन व त्यांचे समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दशरथ महाजन यांच्या राजीनाम्यामुळे एरंडोल तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
१९९० पासून उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला आमदार निवडून देणारा असा एरंडोल विधानसभा मतदारसंघ असून जवळपास ३५ वर्षांपासून या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आले.नुकत्याच विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेची जागा असतांना व डॉ.हर्षल माने सारखे सक्षम उमेदवार असतांना ही जागा उबाठाच्या श्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दिली.वास्तविक डॉ.हर्षल माने यांनी जिल्हा प्रमुख असतांना पडझडीच्या काळात शिवसेनेची पक्ष संघटना टिकवून ठेवली व शिवसैनिकांना विस्कळीत होऊ दिले नाही.विधानसभा निवडणुकीच्या वेळी डॉ.हर्षल माने हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि शेवटी ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली.त्या दिवसापासून शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.या नाराजीतून आपण आपल्या समर्थकांसह उबाठा शिवसेना गटाला ‘ जय महाराष्ट्र ‘ केला असल्याची भुमिका दशरथ महाजन यांनी विषद केली.