जिल्हा उद्योग केंद्राकडे २०० नाभिक समाज बांधवांनी केली कर्जासाठी नोंदणी !
धरणगाव (प्रतिनिधी) : राजकारण नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आज नाभिक समाज बांधवांना साहित्य वाटप करण्यात येत आहे. या साहित्याच्या माध्यमातून नाभिक समाजाने आर्थिक, सामाजिक विकास साधावा, हाच आपला प्रामाणिक हेतू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
एवढेच नव्हे तर जळगावसह धरणगावातील सामाज मंदिरासाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून पुढील काळात नाभिक समाजातील अत्यंत गरजू बांधवांना टपरीसह खुर्ची देत व्यवसायास मदत केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात २०० नाभिक समाज बांधवांनी कर्जासाठी नोंदणी केली असून त्यांना लवकरच ३० ते ३५ टक्के सबसिडीसह कर्ज देखील मिळणार आहे, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
गुलाबराव पाटील फाउंडेशनतर्फे पाळधी येथे नाभिक समाजाला व्यावसायिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पाळधीच्या नाभिक युवा महामंडळाने आयोजन केले होते. प्रसंगी जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.