धरणगाव महाविद्यालयात आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे व आदिवासींमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे हे स्पष्ट केले. आदिवासी लोकांनी गावरान वाणांचे जतन, संवर्धन करून खूप मोठी सिड बँक केली आहे, यामुळे त्यांनी पेरलेले बियापासून सकस धान्य उत्पादन मिळते असे मत प्रा. आर. एम.केंद्रे यांनी व्यक्त केले.
जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन रासेयो, विद्यार्थी विकास विभाग, व मराठी विभागातर्फे दि. ९ ऑगस्ट रोजी धरणगाव महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ प्रा. आर. एम.केंद्रे हे अध्यक्षस्थानी तर प्रा. विश्वजीत वळवी, प्रा. अंतिम गावित, प्रा. डॉ. दीपक बोंडे, प्रा. ज्ञानेश्वर चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी क्रांतिकारक व्यक्तींवर आधारित वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी विविध महान क्रांतिकारक स्त्रियांची वेषभूषा केल्या होत्या.
या मध्ये प्रामुख्याने गायत्री माळी – झाशीची राणी, रोहिणी चौधरी- सावित्रीबाई फुले, अनुष्का जगताप- भिकाजी कामा, मोहिनी शिंदे – कमला चटोपाध्याय, दिपाली सूर्यवंशी – अरुणा असंफ अली, सोनी बारेला – हजरत बेगम यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी डॉ. गौरव महाजन, डॉ.सुषमा तायडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. विश्वजीत वळवी यांनी आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल बिरसा मुंडा, ख्वाजाजी नाईक त्यांचे जीवनपट उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. दुसरे वक्ते प्रा. अंतिम गावित यांनी आदिवासींच्या रूढी, परंपरा, भाषा याचे सखोल ज्ञान उपस्थित विद्यार्थ्यांना दिले व यामुळे सामान्य लोकांपेक्षा आदिवासी वेगळे ठरतात हे उदाहरणासह स्पष्ट केले.
कार्यक्रमानंतर महाविद्यालयाचे ख्वाजाजी नाईक स्मृतीस्थळ, धरणगाव पर्यंत विद्यार्थी स्वयंसेवकांची रॅली काढण्यात आली तसेच ख्वाजाजी नाईक यांच्या समाधी स्थळाला आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील व लोकेश माळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अभिजीत जोशी तर आभार डॉ. गौरव महाजन यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. स्वप्निल खरे, तसेच रसेयो व विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.