जळगाव (प्रतिनिधी) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने अंत्योदय लाभार्थी अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थी यांना गहु व तांदुळ मोफत दिले. त्याच प्रमाणे माहे एप्रिल, मे या महिन्यात राज्य शासनाने केशरी कार्डधारकांना गहु ८ रूपये किलो, तांदुळ १२ रूपये किलो या प्रमाणे सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानाद्वारे दिले होते.
मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता राज्याने केशरी शिधा पत्रिका धारकांना २ महिने जुलै ऑगस्ट या महिन्यात सवलतीच्या दरात दिले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही केशरी शिधा पत्रिका धारकांना धान्य उपलब्ध झाले नाही. येणाऱ्या नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी सण असल्याने कोरोना प्रार्दुभावामुळे काम धंदे बंद असुन अशा वेळेसशासनाने केशरी शिधा पत्रिका धारकांना सवलतीच्या दरात गहु, तांदुळ, साखर, डाळ, तेल अश्या वस्तू स्वस्त धान्य दुकानाद्वारे दिल्यास सणासुदीच्या दिवसांमध्ये गोर गरीबांना त्यांचे सण साजरे करता येईल. तरी शासनाने बायोमॅट्रीक नुसारच लाभार्थ्यांना अन्न धान्य वितरीत करावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर जिल्हा सचिव भारती मोरे, महानराध्यक्ष अनिल अडकमोल, तालुकाध्यक्षा रमाई ढिवरे, महानगर युवाध्यक्ष मिलींद सोनवणे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, शरीफ पिंजारी, मुस्ताक खान, शिराज खान, अक्षय बोदडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.