पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील घटन
पुणे (प्रतिनिधी) : मुळशी धरण भागातील ताम्हीणी घाट परिसरात असणाऱ्या निवे- डोंगरवाडी जवळ प्लस व्हॅली येथील मिल्कीबार धबधब्याच्या पाण्यात पोहताना बुडाल्याने युवकाचा गुरुवारी दि. २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. हा तरुण मूळ भडगाव येथील असल्याने भडगावला शोककळा पसरली आहे.
आदेश जितेंद्र पवार (वय २१, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव, पुणे, मूळगाव भडगाव, जि.जळगाव) असे या युवकाचे नाव आहे. आदेश पवार हा वडगाव येथील सिंहगड महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे कुटुंब मूळचे नाशिकचे आहे. शिक्षणासाठी त्याची कॉलेज परिसरात राहण्याची सोय केली होती.(केसीएन)आदेश व त्याचे तीन मित्र गुरुवारी दि. २७ जून रोजी दुपारी मुळशी धरण भागाच्या अत्यंत दुर्गम परिसरात असणाऱ्या निवे- डोंगरवाडी हद्दीवरील प्लस व्हॅलीतील मिल्कीबार धबधब्याच्या येथे पर्यटनासाठी आले. दुपारी साडेबाराला ते धबधब्याच्या पाण्यात पोहू लागले.
पोहत असताना आदेश धबधब्याच्या पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी व इतर पर्यटकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. परंतु तो बेशुद्ध होता. त्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. दरम्यान, आदेश याला अत्यंत दुर्गम असलेल्या सुमारे दोन हजार फूट खोल दरीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याचे अत्यंत अवघड काम पोलिस, रायगड रेस्क्यू टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी पार पाडले.(केसीएन)नंतर त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने रात्री एक वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून पौड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत त्याचे चुलते प्रशांत दत्तात्रेय पवार (वय ४६, रा. भडगाव, जि. जळगाव) यांनी पोलिसांत खबर दिली.