बोदवड बसस्थानकात चोरट्यांचा इंधन चोरांचा धुमाकूळ
बोदवड (प्रतिनिधी) : बसस्थानकात मुक्कामी उभ्या असलेल्या चार बसेसच्या डिझेल टँकमधून तब्बल २८ हजार रुपये किंमतीचे ६२० लीटर डिझेल चोरीला गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसचालक किरण सीताराम सोनवणे (विदगाव, ता.जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, १३ रोजी बस (एम.एच.०६ एस.८६१३) ही बसस्थानकात लावल्यानंतर त्यांच्यासह अन्य चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी गेले. मात्र मध्यरात्री चोरट्यांनी चारही बसमधून डिझेल लांबवल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता उघडकीस आला. चोरट्यांनी बस (क्रमांक एम.एच.०६ एस.८६१७) मधून १६५ लीटर, बस (क्रमांक एम.एच.२० बीएल ०९४५) मधून १६० लीटर, बस (क्रमांक एम.एच.४०) बस ६९७ मधून १४५ लीटर, बस (क्रमांक एम.एच.४० एन.९७०२) मधून १५० लीटर डिझेल लांबवण्यात आले. एकूण २७ हजार ९० रुपये किंमतीचे डिझेल चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर डेपो मॅनेजर निलेश कलाल, स्थानकप्रमुख अनिल बाविस्कर यांनी पाहणी केली. दरम्यान, चक्क बसेसमधून डिझेल चोरीला गेल्याने चालक वर्ग बस लावण्यासाठी धास्तावले आहेत.