नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघ जाहीर केला. वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे या संघात वर्चस्व जाणवत असले तरी इंग्लंडच्याही खेळाडूंचा भरणा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आयसीसीनं जाहीर केलेल्या १२ सदस्यीय संघात भारताच्या केवळ दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वर्ल्ड कप विजेती कर्णधार मेग लॅनिंगकडे स्पर्धेतील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्यांदा बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं अंतिम लढतीत भारतीय महिला संघावर ८५ धावांनी विजय मिळवला. अॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियानं २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० असा पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला. अॅलिसा हिलीला सामन्यातील, तर बेथ मूनीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या हिली आणि मूनी या जोडीनं सर्वोत्तम संघातही सलामीवीराची जागा पटकावली आहे. मूनीनं संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक २५९ धावा केल्या आहेत. हिलीच्या नावावर २३६ धावा आहेत. त्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी इंग्लंडच्या नॅट शिव्हर ( २०२ धावा), हिदर नाईट ( १९३ धावा) आणि ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग ( १३२ धावा) यांच्यावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलव्हार्ड्ट ( ९३ धावा) हिला संधी दिली आहे. गोलंदाजी विभागाची जबाबदारी जेस जोनासेन ( १० विकेट्स ), सोफी ईस्लेस्टोन ( ८ विकेट्स), अॅना श्रुब्सोले ( ८ विकेट्स) , मीगन स्कट ( १३ विकेट्स), पूनम यादव ( १० विकेट्स) यांच्यावर आहे. टीम इंडियाची सलामीवीर शेफाली वर्माचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. तिनं १६३ धावा केल्या.