डॉ. फुलपाटील अचानक खुर्चीवर प्रकटल्याने प्रशासकीय गोंधळ ; डॉ. रामानंद संचालकांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. १३ सप्टेंबर रोजी अधिष्ठाता पदाच्या खुर्चीचा संभ्रम आणखी वाढला. नागपूर येथून आलेले डॉ. मिलिंद फुलपाटील हे अचानकपणे सकाळी १० वाजता अधिष्ठाता पदाच्या खुर्चीवर जाऊन बसल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, नियमित अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना हि माहिती कळताच त्यांनी याबाबत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना अवगत केले. संचालकांनी, थोडे थांबा असे सांगितल्याने डॉ. रामानंद हे त्यांच्या घरी होते. दरम्यान, याबाबत राज्याचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी संपर्क केला असता, माझी प्रकृती ठीक नाही, मी माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांच्या बदल्या दि. २६ ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढल्या. त्यात जळगावच्या प्राध्यापक, शरीररचना शास्त्र या रिक्त पदी नेमणूक करून अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार घेण्यासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद फुलपाटील यांना आदेशित केले होते. मात्र जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक पद हे रिक्त नाही. तेथे आधीच डॉ. अरुण कसोटे हे कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना प्राध्यापक, शरीररचना शास्त्रपदी नेमणूक करून घेण्यास अडचण आहे, आपण मार्गदर्शन करावे असे पत्र अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना १ सप्टेंबर रोजी पाठवले. तसेच डॉ. फुलपाटील हे ७ सप्टेंबर रोजी पदभार घेण्यास आले तेव्हाही स्मरणपत्र पाठवले. याबाबत वरिष्ठ पातळीवरून अद्यापि आदेश आलेले नाही.
आज सोमवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. फुलपाटील हे थेट अधिष्ठाता पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना काही सुचेना झाले. नियमित अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना हे कळताच त्यांनी संचालकांना तत्काळ याबाबत कळवले. संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी, थांबा पाहतो मी असे सांगितले. त्यामुळे डॉ. रामानंद हे अधिष्ठाता कार्यालयासमोरील घरीच राहिले.
तर दुसरीकडे, डॉ. फुलपाटील यांनी मात्र महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार सुरु केला. अनेक शासकीय कागदपत्रांवरती अधिष्ठाता म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. तसेच, महत्वाची असलेली महाविद्यालय परिषदची बैठक देखील बोलावली. दुपारी १ ते १. ३० या वेळेत हि बैठक झाली. बैठकीत डॉ. फुलपाटील यांनी सदस्यांचा परिचय करून घेत विभागातील समस्यांविषयी विचारणा केली. तसेच, मनुष्यबळाची उपलब्धता व कमतरता याबाबत चर्चा केली.
डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा ते म्हणाले की, शासकीय आदेशाचे पालन करून पदभार घेतला आहे. डॉ. रामानंद यांनी पदभार दिला काय ? या प्रश्नांवर डॉ. फुलपाटील म्हणाले कि, पदभार देणे न देणे हा त्यांचा प्रश्न आहे. दुसरा व्यक्ती खुर्चीवर बसला असताना मी कसा तेथे बसू ? त्यांची ऑर्डर प्रतिनियुक्तीने आणि संचालकांची होती. आताची माझी ऑर्डर सचिवांची व बदलीची आहे. शरीररचनाशास्त्र विभागाचे पद रिक्त असल्याबाबत विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
डॉ. जयप्रकाश रामानंद यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, डॉ. फुलपाटील यांच्या एकतर्फी पदभार घेण्याबाबत संचालकांशी चर्चा केली आहे. त्यांना रिक्त पदाविषयी मार्गदर्शन मागितले होते, मात्र अद्यापि प्राप्त नाही. गेल्या सव्वा वर्षाच्या कारकिर्दीत अविस्मरणीय क्षण मी अनुभवले. भौतिक सुविधा, सुशोभीकरण आणि बदललेली मानसिकता या तीन बाबींवर प्रामुख्याने मी काम केले. कोरोनाच्या दोन्ही लाटेत उत्कृष्ट काम झाल्यानंतर आता तिसऱ्या लाटेसाठी देखील पूर्णतः तयारी केली होती. कोरोनाविरहित आरोग्य सुविधा देखील उत्तमरीत्या जनतेला पुरविल्या आहेत. अनेक गौरव ह्या १५ महिन्यात रुग्णालय व महाविद्यालयाला मिळाले आहेत, असेही ते म्हणाले.







