यावल;- तालुक्यातील किनगाव जवळ झालेल्या अपघातात १३ मजूरांसह २ बालकांचा अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी ट्रकचालकासह पपई व्यापारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना यावल पोलीसांनी अटक केली आहे.आयशर चालक शेख जहीर शेख बदरूद्दीन राहणार रावेर व पपई व्यापारी अमीन शाह अशपाक शाह राहणार केऱ्हाळा तालुका रावेर या दोघांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येवुन ट्रकचालक व व्यापारी या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहीती दिघावकर यांनी दिली.
तालुक्यातील किनगाव गावाजवळ अंक्लेश्वर-बुऱ्हाणपुर राज्य मार्गावर येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास पपई भरून धुळयाहुन रावेरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी होवून झालेल्या भिषण अपघातात १३ मजुरांसह २ बालकांचा दुदैवी मृत्यु झाला आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी घटनेचे वृत्त कळताच तात्काळ दुपार २ वाजेच्या सुमारास किनगाव येथे घटनास्थळी भेट देवुन अपघात स्थळाची पाहणी केली.
दरम्यान यावल येथे पोलीस स्टेशनला भेट देवुन अपघाता संदर्भातील माहिती घेवुन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना घटने संदर्भातील सुचना दिल्या.








