सामनेर येथील घटनेने समाज मन सुन्न !

पाचोरा ;– मॉर्निंग वॉकसाठी नेहमीप्रमाणे निघालेल्या महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन्ही महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सामनेर गावात घडली असून गावात शोककळा पसरली आहे . यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपी अज्ञात वाहनचालकाला पकडून कडक शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील सामनेर ता. पाचोरा येथील अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी पहाटे सामनेर ते लासगाव दरम्यान रोज जात असतात. या अनुषंगाने आज पहाटे पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनिषा साहेबराव पाटील (वय – ५० ) व अनिता शहादु पाटील (वय – ४८) या दोघी महिला मॉर्निंग वॉक करून परत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली .
हा अपघात एवढा जोरदार होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. तर दुसरी महिलेस ५० मीटर फरफटत नेले. दरम्यान वाहन चालकाने घटना स्थळावरून पलायन केले आहे. दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे ,पोलिस हवालदार रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहेत.







