निंभोरा,ता.रावेर– परप्रांतीय मजुरांना उत्तर भारतात घेऊन जाणाऱ्या विशेष श्रमिक गाडीला ८ तासाहून अधिक वेळ निंभोरा रेल्वे स्थानकावर थांबून ठेवल्याने यातील प्रवाशांनी संचारबंदीचा नियम पायदडी तुडवत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला व येत्या काळात यातून कोरोनाची उत्पत्ती झाल्यास जबाबदार म्हणून रेल्वे प्रशासन,रेल्वे सुरक्षा बल व याप्रकरणी अक्षम्य दुर्लक्ष झालेल्या या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील माजी उपसरपंच व जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी केली आहे.
परप्रांतीय मजुरांना उत्तर भारतात पोहचवण्याच्या बेताने मुंबईहून सोडण्यात आलेली विशेष श्रमिक गाडी शुक्रवार,२२ मे रोजी
तांत्रिक कारणास्तव सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निंभोरा रेल्वे स्थानकावर पडून होती. त्यापाठोपाठ इतर गाड्या सुद्धा एकामागे एक आल्याने व सिग्नल क्लियर नसल्याने येथे थांबल्या.
यादरम्यान,गाडीतील प्रवाशांना उन्हामुळे त्रास झाल्याने शेकडो प्रवासी एकाचवेळी पिण्याचे पाणी आणि काही खायला मिळते का ? या शोधार्थ रेल्वे स्थानकातून गावात व परिसरात हिंडत होते.कोरोनाचा अत्यंत हॉट स्पॉट असलेल्या मुंबईतून कोणतीही तपासणी न करता प्रवासाला निघालेल्या या प्रवाशांमुळे निंभोरा गावात सोशल डिस्टंशिंगचा फज्जा उडाला.
प्रवाशांचे अन्न पाण्यावाचून झालेले हाल पाहून निंभोरा गावातुन काही मदतीचे हात पुढे आले.प्रवाशांना या मदतगार लोकांनी केळी, चिवडा, फराळ,वेफर्स यासोबत तातडीने खिचडी बनवून त्यांची क्षुधा शांती केली खरी पण यावेळी उडालेला सोशल डिस्टन्सचा बोजवारा लक्षात घेता व रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असतांना दुर्लक्ष करणाऱ्या व कोरोनासाठी खास नोडल अधिकारी नेमलेल्या प्रांताधिकारी व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होत आहे.
रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका माणुसकी भावनेतून मदतीचा हात बनलेल्या निंभोरा व परिसरातील ग्रामस्थांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण,या हजारो प्रवाशांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास आणि त्या दिवसाच्या झालेल्या गर्दीमुळे संपर्कातुन इतरांना बाधा झाल्यास जबाबदार कोण ?
असा सवाल व्यक्त करत त्यानंतर सुद्धा कारण नसताना निंभोरा रेल्वे स्थानकात प्रवाशी गाड्या थांबण्याचा जो प्रकार सुरू आहे याची सुद्धा चौकशीची मागणी श्री.ठाकरे यांनी केली आहे. याप्रकरणी दुर्लक्ष केलेल्या निंभोरा रेल्वे स्टेशन मास्तर,महसूल व पोलीस प्रशासनाविरुद्ध वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
——————-