पुणे ( वृत्तसंस्था) देशात वाढणाऱ्या करोनाचा डबल म्युटंट विषाणू बी.1.167 याच्यामुळेच दुसरी लाट वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा विषाणू जनुकीय संरचनेची तपासणी करताना गेल्यावर्षी पाच ऑक्टोबरला पहिल्यांदा आढळला होता. इ484क्यू आणि एल4276आर हे दोन्हीही विषाणू या प्रकाराच्या विषाणूतील काटेरी प्रथिनांच्या वलयात असतात. मात्र, निधीअभावी आणि करोनाबाधितांचा आलेख स्थिरपणाने उतरत असल्याने आलेल्या शैथिल्यामुळे तसेच स्पष्ट सूचनांअभावी जनुकीय संरचनांची तपासणी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात खूप कमी केली. पण आता शास्त्रज्ञ धोक्याची घंटा वाजवत आहेत. कारण आता बी.1.167 मध्ये तिसरे उत्परिवर्तन आले आहे. त्याचा मागोवा घेणे आणि अधिकची सजगता बाळगणे अनिवार्य बनले आहे.
इन्साकॉगने फेब्रुवारी महिन्यापासून जनुकीय संरचना तपासणीत आलेल्या शैथिल्याच्या पद्धतीत सुधारणा केली आहे. त्यांनी सुमारे 13 हजार नमुन्यांची तपासणी केली आहे. अर्थात, हे प्रमाण पुरेसे नाहीच. सापडणाऱ्या बाधितांपैकी पाच टक्के नमुन्यांची जनुकीय संरचना तपासण्याचे इन्साकॉगने उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात, ते फारच महत्त्वाकांक्षी आहे. कारण दररोज अडीच लाख नवे बाधित सापडत आहेत. त्यामुळे पाच टक्क्यांच्या हिशेबाने दररोज 12 हजार 500 नमुन्यांची जनुकीय संरचना तपासावी लागेल. सध्या हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
दुहेरी उत्परिवर्तन झालेल्या विषाणूत आणखी बदल झाल्याचे आणि आता तो तिहेरी उत्परावर्तित झाल्याचे आरोग्य मंत्रालयाला गेल्या आठवड्यात कळवण्यात आले आहे. तसे तीन प्रकारचे नमुने मिळाले आहेत. त्यातील दोन प्रकारांत काटेरी प्रथिनांच्या रचनेत बदल आढळले आहेत. हे नमुने महाराष्ट्र, दिल्ली, प. बंगाल आणि चंदिगढ या राज्यांतील आहेत. या सर्व राज्यात करोनाची दुसरी लाट जोरात अहे. विषाणूच्या या तिसऱ्या आवृत्तीच्या काटेरी प्रथिनांबाहेरही बदल आढळत आहेत. असे बदल तब्बल 17 नमुन्यात आढळले आहेत. पुन्हा हे नमुने महाराष्ट्र, दिल्ली, प. बंगालमधील आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
आपण पाहिले तर प. बंगाल हा सध्या करोनाचा हॉटस्पॉट ठरलेला आहे. तेथे हा विषाणूचा नवा अवतार मानवी प्रतिकारशक्तीला चुकवून संसर्ग करण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक जनुकीय संरचनेचा उलगडा करण्याची गरज असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
वेगाने पसरणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येकडे आणि विषाणूच्या नव्या स्वरूपाकडे जग लक्ष देऊन पाहात आहे. अमेरिकेतील अँडरसन लॅबने दिलेल्या माहितीनुसार पाच ऑक्टोबरला आढळलेल्या बी. 1.167 या म्युटंटचे भारतात 566 नमुने 18 एप्रिलला आढळले.