मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- लोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.
पण, लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरू करायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
त्यांनी म्हटलं, “लोकल सरसकट सर्वांना सुरू करायला हवं. वेगवेगळ्या वेळा ठेवलं तर कुणी पाळत नाही. एकाच वेळी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या वेळा बदलण्याची व्यवस्था आस्थापनांमध्ये आहे का, हा पण एक मुद्दा आहे.”
तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, “काही प्रवासी संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याठिकाणी आम्ही कसं नियोजन करणार आहोत, याची माहिती दिली होती. पण रेल्वे मंत्रालयाकडून प्रतिक्रिया आली नाही.
“सरसकट लोकल सुरू करावी, अशी लोकांची मागणी आहे. हळूहळू यामध्ये बदल करता येईल. लोकांनी शिस्त पाळली तर टप्प्याटप्प्याने सरसकट लोकल सुरू करता येऊ शकेल. येत्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसात परिस्थिती पाहून हा निर्णय घेता येईल. वेळेबाबतचा निर्णय येत्या काही कालावधीत घेण्यात येईल.”
रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं आहे.
पण अद्याप रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिलेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.








